मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार आहेत. अलीम दार, कुमार धर्मसेना, मरे इरासमस, क्रिस गफाने, रिचर्ड एलिंगवर्थ, रिचर्ड, केटलब्रो, नायजेल लॉन्ग. इयन गोल्ड, ब्रूस ऑक्सेंफर्ड, सुंदरम रवी, पॉल रायफल, रॉड टकर, जोएल विल्सन, मायकल गॉफ, रुचिरा पल्लियागुरगे, पॉल विल्सन हे १६ अंपायर मैदानात दिसतील. या अंपायरना आयसीसीकडून मिळणाऱ्या पगारावर नजर टाकूयात.
सुंदरम रवी
भारतामधील ४२ वर्षांचे सुंदरम रवी हे श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांच्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये गेलेले पहिले अंपायर होते. रवी यांनी ३३ टेस्ट, ४२ वनडे आणि १८ टी-२० मॅचमध्ये अंपायरिंग केली आहे. रवी यांना वर्षाला २४,६०,२०२ रुपये मानधन मिळतं. तर टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात.
अलीम दार
पाकिस्तानचे ५० वर्षांचे अलीम दार आयसीसीच्या अंपायरच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत. १६ फेब्रुवारी २००० साली पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मॅचमधून दार यांनी पदार्पण केलं. तेव्हापासून अलीम दार यांनी १२५ टेस्ट, २०० वनडे आणि ४३ टी-२० मॅचमध्ये भाग घेतला आहे. अलिम दार यांना वर्षाला ४५,००० डॉलर म्हणजेच ३१,६३,११७ रुपये वेतन मिळतं. टेस्ट मॅचमध्ये दार यांना ३,००० डॉलर (२,१०,८७४ रुपये), टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात.
कुमार धर्मसेना
४८ वर्षांचे कुमार धर्मसेना १९९६ साली वर्ल्ड कप जिंकलेल्या श्रीलंकेच्या टीमचे सदस्य होते. २००९ साली धर्मसेना यांनी अंपायर म्हणून पदार्पण केलं. तेव्हापासून धर्मसेना यांनी ६० टेस्ट, ९५ वनडे आणि २२ टी-२० मॅचमध्ये अंपायरची भूमिका बजावली. धर्मसेना यांना वर्षाला जवळपास ३१,६३,११७ रुपये मानधन मिळतं. टेस्ट मॅचमध्ये धर्मसेना यांना २,१०,००० रुपये, टी-२० मॅचमध्ये ७० हजार रुपये आणि वनडे मॅचसाठी जवळपास १,५०,००० रुपये मिळतात.
मरे इरासमस
दक्षिण आफ्रिकेचे ५५ वर्षांचे मरे इरासमस आयसीसीच्या अंपायरच्या एलीट पॅनलमध्ये आहेत. मरे इरासमस यांनी २००६ साली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातल्या टी-२० मॅचपासून अंपायर क्षेत्रात पदार्पण केलं. २०१७ साली इरासमस यांना आयसीसी अंपायर आणि लागोपाठ दोन वर्ष डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. इरासमस यांनी ५५ टेस्ट, ८२ वनडे आणि २६ टी-२० मॅचमध्ये अंपायरिंग केली आहे. इरासमस यांना टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात. याशिवाय इरासमस यांना वर्षाला ३५,००० डॉलर (२४,६०,२०२ रुपये) वेतन मिळतं.
क्रिस गफाने
४३ वर्षांचे न्यूझीलंडचे क्रिस गफाने आयसीसी अंपायरच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत. सप्टेंबर २०१० साली कॅनडा आणि आयर्लंडच्या मॅचमधून गफाने यांनी पदार्पण केलं. गफाने २७ टेस्ट, ६० वनडे आणि २० टी-२० मॅचमध्ये अंपायर होते. गफाने यांना टेस्ट मॅचसाठी २,१०,००० रुपये, टी-२० मॅचमध्ये ७० हजार रुपये आणि वनडे मॅचसाठी जवळपास १,५०,००० रुपये मिळतात. गफाने यांना वर्षाला ३१,६३,११७ रुपये मानधन मिळतं.
रिचर्ड एलिंगवर्थ
५५ वर्षांच्या इंग्लंडच्या रिचर्ड एलिंगवर्थ यांनी ४२ टेस्ट, ५९ वनडे आणि १६ टी-२० मध्ये अंपायरिंग केली आहे. एलिंगवर्थ यांना टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात. याचबरोबर एलिंग यांना वर्षाला आयसीसी मानधन म्हणून ३५,००० डॉलर (२४,६०,२०२ रुपये) देते.
रिचर्ड केटलब्रो
४६ वर्षांच्या इंग्लंडच्या रिचर्ड केटलब्रो यांनी एप्रिल २००२ पासून इंग्लंडमध्ये प्रथम श्रेणी अंपायर म्हणून सुरुवात केली. केटलब्रो यांनी ५८ टेस्ट, ७८ वनडे आणि २२ टी-२० मॅचमध्ये अंपायरची भूमिका बजावली. २००९ साली केटलब्रो आयसीसीच्या पॅनलमध्ये आले. केटलब्रो यांना आयसीसी वर्षाला ३१,६३,११७ रुपये मानधन देतं. केटलब्रो यांना टेस्ट मॅचसाठी २,१०,००० रुपये, टी-२० मॅचमध्ये ७० हजार रुपये आणि वनडे मॅचसाठी जवळपास १,५०,००० रुपये मिळतात.
नायजल लॉन्ग
५० वर्षांचे इंग्लंडचे नायजल लॉन्ग आयसीसी अंपायरच्या एलीट पॅनलमध्ये आहेत. नायजल लॉन्ग यांनाही वर्षाला ३१,६३,११७ रुपये मानधन मिळतं. लॉन्ग यांना टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात.
इयन गोल्ड
इंग्लंडचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू इयन गोल्ड आयसीसीच्या एलीट पॅनलचे अंपायर आहेत. वेस्ट इंडिजमध्ये २००७ सालच्या वर्ल्ड कपपासून गोल्ड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अंपायरिंग करायला सुरुवात केली. गोल्ड यांनी ७४ टेस्ट, १३५ वनडे आणि ३७ टी-२० मॅचमध्ये अंपायरची भूमिका निभावली. गोल्ड यांना मानधन म्हणून वर्षाला ३१,६३,११७ रुपये मिळतात. तसंच टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) दिले जातात.
ब्रुस ऑक्सेंफर्ड
ऑस्ट्रेलियाच्या ब्रुस ऑक्सेंफर्ड यांनी २००८ साली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग केलं. २०१२ साली त्यांची आयसीसी एलीट पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आली. ऑक्सेंफर्ड यांनी ५५ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी-२० मॅचमध्ये अंपायरची भूमिका बजावली. ऑक्सेंफर्ड यांना मानधन म्हणून वर्षाला ३१,६३,११७ रुपये मिळतात. तसंच टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) दिले जातात.
पॉल रायफल
५३ वर्षांचे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू पॉल रायफल यांनी २००२ सालापासून प्रथम श्रेणी मॅचमध्ये अंपायरिंगला सुरुवात केली. २००८ साली त्यांची नियुक्ती आयसीसीच्या एलीट पॅनलवर झाली. रायफल ४३ टेस्ट, ६१ वनडे आणि १६ टी-२० मॅचमध्ये अंपायर होते. रायफल यांना टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात.
रॉड टकर
५४ वर्षांचे ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर एलीट पॅनलमध्ये आहेत. टकर यांनी ६७ टेस्ट, ७८ वनडे आणि ३५ टी-२० मॅचमध्ये अंपायरिंग केली आहे. टकर यांना वर्षाला मानधन म्हणून ३१,६३,११७ रुपये मिळतात. तर टेस्ट मॅचमध्ये टकर यांना २,१०,००० रुपये, टी-२० मॅचमध्ये ७० हजार रुपये आणि वनडे मॅचसाठी जवळपास १,५०,००० रुपये मिळतात.
जोएल विल्सन
त्रिनिदाद टोबॅगोच्या जोएल विल्सन यांनी २०१५ वर्ल्ड कपमध्ये अंपायरची भूमिका बजावली. विल्सन यांनी १३ टेस्ट, ५८ वनडे आणि २६ टी-२० मॅचमध्ये काम केलं आहे. विल्सन यांना टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी १,००० डॉलर (७०,२९१ रुपये), वनडे मॅचसाठी २,२०० डॉलर (१,५४,६४१ रुपये) मिळतात. मानधन म्हणून आयसीसी जवळपास २४,६०,२०२ रुपये देतं.
मायकल गॉफ
इंग्लंडच्या ३९ वर्षांच्या मायकल गॉफ यांनी २००६ साली सुरुवात केली. गॉफ यांनी ९ टेस्ट, ५२ वनडे आणि १४ टी-२० मॅचमध्ये अंपायरिंग केलं. मायकल गॉफ यांना वर्षाला ३१,६३,११७ रुपये मानधन दिलं जातं. टेस्ट मॅचमध्ये त्यांना २,१०,००० रुपये, टी-२० मॅचमध्ये ७० हजार रुपये आणि वनडे मॅचसाठी जवळपास १,५०,००० रुपये मिळतात.
रुचिरा पल्लियागुरगे
५१ वर्षांच्या रुचिरा पल्लियागुरगे यांनी २०११ साली श्रीलंका ऑस्ट्रेलियातल्या मॅचपासून सुरुवात केली. पल्लियागुरगे यांनी २ टेस्ट, ७१ वनडे आणि ३२ टी-२० मध्ये अंपायरिंग केली. पल्लियागुरगे यांना वर्षाला जवळपास ३१,६३,११७ रुपये मानधन दिलं जातं. तर टेस्ट मॅचमध्ये २,१०,८७४ रुपये, टी-२० मॅचसाठी ७०,२९१ रुपये, वनडे मॅचसाठी १,५४,६४१ रुपये मिळतात.
पॉल विल्सन
पॉल विल्सन हे ऑस्ट्रेलियाच्या प्रोजेक्ट अंपायरच्या पॅनलचे अंपायर आहेत. २०१८ सालच्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्येही विल्सन होते. विल्सन २३ वनडे, ११ टी-२० मॅचमध्ये अंपायर होते. विल्सन यांना टी-२० मॅचसाठी ७०,२९१ रुपये, वनडे मॅचसाठी १,५४,६४१ रुपये मिळतात.