भोसरी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिका, महावितरण कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पुणे रेल्वे विभागीय मंडळ, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली.

पावसाळा जवळ आल्यामुळे आदिवासी पाड्यातील जनतेशी सहज संपर्क व्हावा या दृष्टीने या भागात मोबाइल टॉवरची उभारणी करण्यात यावी अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.

पुणे- नाशिक रेल्वेमार्गाचे सादरीकरण लवकरात लवकर करा अशी मागणी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

त्याचप्रमाणे हडपसर भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना डॉ. कोल्हे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना केली. शिवनेरी गडावरील नियोजित रोप वेचा प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी केली.

शिरूर मतदारसंघातील विकासकामांना गती मिळवून देण्यासाठी महामार्ग रुंदीकरण, आदिवासी भागाचा विकास संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, बैलगाडा शर्यत, रोजगार निर्मिती संदर्भातील आश्वासनांची पूर्तता करणे आणि मतदारसंघात राज्यासाठी पथदर्शी ठरणारे प्रकल्प उभारणे अशी त्रिसूत्री अवलंबणार असल्याची ग्वाही डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. त्याचप्रमाणे अधिवेशन काळ वगळता अन्य काळामध्ये आठवड्यातून तीन दिवस मतदारसंघात उपस्थित राहून जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले.