नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिल्म्स डिव्हिजनच्या दूरदृष्टीकोनामुळेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगातल्या सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक ठरला आहे असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि अमित देखमुख यांच्या हस्ते आज मुंबईत फिल्म्स डिव्हिजन इथं १६ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ्फचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते.

या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ सिनेमाच नाही, तर भारताची कला आणि संस्कृतीचा प्रसारासाठी फिल्म्स डिव्हिजननं दाखवलेली वचनबद्धता कौतुकास्पद असल्याचंही देशमुख यावेळी म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक डॉक्टर एस कृष्णस्वामी यांना, त्यांनी कथाबाह्य सिनेमाच्या निर्मितीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, १० लाख रुपये, आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरुप आहे.
दक्षिण आशियातल्या माहितीपट आणि लघुपटांसाठीचा सर्वात जुना आणि प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशी मिफ्फची ओळख आहे. कोस्टटॅटींन ब्रॉझिट यांच्या रशियन ॲनिमेशन चित्रपट ‘वुई कान्ट लिव विदाऊट कॉसमॉस’ या रशियन ॲनिमेशन पटानं आज महोत्सवाला सुरुवात झाली. ऑस्करसाठी नामांकन मिळालेला लघुपट ‘फॉव्ह’ आणि गौतम बोरा यांच्या ‘ऱ्हाईम ॲण्ड ऱ्हाईम ऑफ लूम’ हा माहितीपटही आजच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान दाखवला जाणार आहे.
आजपासून २ फेब्रुवारीपर्यंत हा चित्रपट महोत्सव सुरु राहणार आहे. मुंबई विद्यापठाचं कलिना इथलं प्रांगण, मालाड मधलं देबिप्रसाद गोयंका व्यवस्थापन महाविद्यालय आणि पार्ल्यातल्या उषा प्रवीण गांधी महाविद्यालयातही या महोत्सवातले काही चित्रपट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवासाठी यंदा राष्ट्रीय स्तरावर विक्रमी 729 चित्रपट तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 देशांतून 144 चित्रपट प्रवेशिका आल्या आहेत. युरोपीय महासंघातील चित्रपट, ‘कंट्री फोकस’ विभागात आयर्लंडचे सर्वोत्कृष्ट माहितीपट, त्याशिवाय, ईशान्य भारतातील निवडक माहितीपट-लघुपट, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेले चित्रपट, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे चित्रपट यावर्षी महोत्सवात दाखवले जातील.
महोत्सवाची सांगता आणि पुरस्कार वितरण समारंभ 3 फेब्रुवारीला संध्याकाळी वरळीच्या नेहरू सेंटर सभागृहात होईल. यावर्षीपासून या महोत्सवात “जल संवर्धन आणि हवामानबदल” या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी एक नवा पुरस्कार दिला जाणार आहे.