मुंबई : ‘द कोड’ या मुक्ता महाजनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. जीवनामध्ये यशप्राप्तीमध्ये येणाऱ्या सात अडथळ्यांचे सुंदर विवेचन लेखिका मुक्ता महाजनी यांनी समर्पक उदाहरणांसह आपल्या ‘द कोड’ या पुस्तकामध्ये केले आहे, असे उद्गार यावेळी गृहमंत्र्यांनी काढले.

श्री. देशमुख म्हणाले, “राजकीय, सामाजिक जीवनात काम करत असताना आम्हाला अनेक स्तरातील नागरीक भेटायला येतात. अशा वेळी सर्वांचे म्हणणे अत्यंत शांतपणे, संयमाने ऐकून घ्यावे लागते. काही लोक तर आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्यांमध्ये आम्ही मार्ग काढावा, अशी अपेक्षा ठेवतात. मात्र, अशावेळी शांतपणे समोरच्याचे ऐकून त्यांचे समाधान करावे लागते. जीवनात यशस्वी होण्यासाठी संयमासोबतच अनेक बाबी महत्त्वूर्ण ठरतात”

श्री. देशमुख म्हणाले, अति अहंकार, अती स्पर्धात्मक वृत्ती, क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा ठेवणे, असूया आदी बाबींमुळे जीवनात यश मिळण्यात अडथळे येतात. यापासून लांब राहिले पाहिजे हे समर्पक उदाहरणांसह लेखिका मुक्ता महाजनी यांनी आपल्या पुस्तकात सांगितलेआहे. त्याचा उपयोग नक्कीच लहान, मोठ्या अशा सर्वांनाच होईल.

कार्यक्रमास मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत वडेलकर, मुक्ता महाजनी  यांच्या आई रमोला महाजनी, कॅ.बात्राआदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती महाजनी यांनी आपल्या पुस्तकाबद्दल माहिती दिली. प्रारंभी श्री. देशमुख यांनी विश्वेश्वरैय्या आणि एस. के. वानखेडे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. स्वागत श्री. कलंत्री यांनी केले. यावेळी मान्यवरांमध्ये पॅनेल चर्चाही करण्यात आली.