नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं यासंदर्भात औद्योगिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते.
“ग्राहक संरक्षण कायदा २०१९” अंतर्गत या प्राधिकरणाची स्थापना केली जाईल. ग्राहकांचे हक्क, अनुचित व्यापारव्यवहार, दिशाभूल करणा-या जाहिराती इत्यादींशी संबंधित प्रश्नांचा निपटारा करणं, तसंच बनावट किंवा भेसळीचे पदार्थ, उत्पादनं विकणा-यांना दंड करणं हे या प्राधिकरणाचं काम असेल.
त्यासाठीचे नियम येत्या एक ते दीड महिन्यात निश्चित केले जातील, असं पासवान यांनी सांगितलं.