नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. या सभांमध्ये पोषणपंचायत, जमिनींविषयीचे कायदे, शिक्षण, सुरक्षा, गर्भवती महिलांचं आरोग्य आणि समान संधी अशा विषयांवर चर्चा केली जावी असं, पंचायत राज मंत्रालयानं सर्व राज्यांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
यासोबतच मंत्रालयानं या सभांमध्ये नवजात बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी जन्मापासून पहिले एक हजार दिवस स्तनपानाची गरज आणि १०९८ या मदत क्रमांकाविषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनं एका विशेष संदेशाचं प्रारुपही सर्व राज्यांना पाठवलं आहे.
अंगणवाडी सेविका, सखी सेविका आणि सुईण यांच्यासारख्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींच्या सहकार्यानं या सभा आयोजित केल्या जाव्यात, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.