नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोना विषाणू संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता इटली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण कोरियामधल्या कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत इटली मधल्या बाधित नागरिकांची संख्या अधिक आहे. दक्षिण कोरियात सध्या कोरोनाचे ७ हजार ३१३ संक्रमित रुग्ण आहेत. मात्र तिथे कोरोनाचा फैलाव हळूहळू कमी होत आहे.
इटलीत काल कोरोनामुळे १३३ जणांनी प्राण गमावल्याने तिथे आतापर्यंत ३६६ जण मरण पावले आहेत, असं नागरिक सुरक्षा संस्थेनं कळवलं आहे. चीनच्या पाठोपाठ कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. तसंच कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून इटली मधल्या शाळा, संग्रहालय, नाइट क्लब, व्यायामशाळा आणि इतर संस्था येत्या ३ एप्रिल पर्यंत बंद राहतील , अशी घोषणा इटली चे प्रधानमंत्री ग्यूसेप्पे कोंते यांनी केली आहे.