मुंबई : सोशल डिस्टन्सींग पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
राज्यातील रूग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह सर्व यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नागरिकांनी देखील लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत घरीच राहून सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये. विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करतील, अशी वेळ न येऊ देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आवाहन मंत्रीमहोदयांनी केले आहे.
अचूक नियोजन
आपत्ती काळात करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी अचूक नियोजन आवश्यक असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्याच्या शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा नको, तसेच अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सोबतच शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला नको. याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. याबरोबरच रुग्णसेवेसाठी लागणारी औषधे, यंत्रसामग्री याची सांगलीसह राज्यात कमी नाही, जीवनावश्यक वस्तूंची ही उपलब्धता आहे, वितरण ही व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये असे ही ते म्हणाले.
नागरिकांना दिलासा
आपत्ती काळात शासन प्रशासनाने नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असते, त्यानुसार सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विविध माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटीतून दिलासा देण्याचे काम मंत्रीमहोदयांनी केले.
जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात भेटी देऊन त्याठिकाणी लोकांना दिलासा दिला. लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, काही ठिकाणी भोजन व्यवस्था तसेच ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणास आवश्यकता असेल तेथे साधनसामुग्री अशा वेगवेगळ्या मदतीवर भर दिला.