नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ७७ असून गेल्या चोवीस तासात ४९१ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी आज दिली. देशात सध्या १७ हजार ६१० जणांवर उपचार सुरू असून ४ हजार ७४९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातल्या रूग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण २० पूर्णांक ५७ शतांश  टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत कोरोनामुळे देशात ७१८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या २८ दिवसात १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नसून ८०जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही रूग्ण सापडलेला नाही. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १ हजार ६८४ नवे रूग्ण आढळले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यात आपल्याला यश येत असून कोरोनाबाधित नसलेल्या जिल्ह्यांच्या संख्येत वाढ व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या लढ्याला ईतर गोष्टींबरोबर जोडू नये त्याचप्रमाणे रूग्ण शोधून त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू व्हावेत यावर सरकारचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाविरूद्दचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी त्याचप्रमाणे यापुढच्या आरोग्य सेवांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जात असल्याचं एनसीडीसीच्या सचिवांनी सांगितलं. जिल्हा हे केंद्र धरून त्यानुसार थेट केंद्रापर्यंत माहितीचं आदानप्रदान करणारी एक यंत्रणा या आधीच विकसित केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी  वाढला असून देशात तापसदृश्य आजारांच्या औषधांच्या मागणीत वाढ झाली नसल्यानं आपण कोरोनाच्या या साथीला नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झालो आहोत असं मत ही त्यांनी व्यक्त केलं. देशात लॉकडाऊन योग्य वेळेत आणल्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं निती आयोगाच्या आरोग्य विभागाच्या सदस्याने यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रासाठीच्या केद्रीय आंतरमंत्रालय समितीनं राज्यात कोरोना व्यतिरिक्त रुग्णांसाठी आरोग्य सेवा पुरवण्यावर भर दिला असून धारावीमध्ये अतिरिक्त फिरती शौचालय उपलब्ध करण्याची मागणी केंद्राकडे केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.