नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. वृत्तसंस्थेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
कोविड १९ विषाणूच्या संकटाच्या काळात महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता योग्य नाही, यात आपण लक्ष घालावं, असं ठाकरे यांनी मोदी यांना सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानं दोन वेळा पारित केला आहे, मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही.