पुणे : भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य सैनिक श्री. शंकर वासुदेव परांजपे यांचा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला. भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने दरवर्षी आज ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांचा महामहिम राष्ट्रपती महोदय यांचे हस्ते नवी दिल्ली येथे सत्कार केला जातो. परंतु या वर्षी कोविड- १९ प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे बोलावणे उचित ठरणार नसल्याने उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने सदरचा कार्यक्रम राष्ट्रपती भवन येथे न होता तो निवड करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार शाल वस्ञ देऊन करण्याचे केंद्रीय गृह मंञालयाचे निर्देश होते.

त्यानुसार महाराष्ट्रातुन १० नावे केंद्र शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्याकडुन स्वातंत्र्य सैनिक मा. श्री.शंकर वासुदेव परांजपे राहणार गट नं.६, अथर्व, प्रभातरोड, लेन नं ११, पुणे यांचेही नावही सत्कारासाठी पाठविण्यात आले होते. या १० नावामधे श्री.परांजपे यांची निवड झाल्याने आज त्यांचा सत्कार केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी श्री.संतोषकुमार देशमुख यांनी त्यांचे राहत्या घरी जाऊन शाल वस्ञ देऊन स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार केला. यावेळी मंडल अधिकारी श्री. ठुबे तसेच परांजपे कुटुंबीय उपस्थित होते.