नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला. शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करणंच नाही तर बाजार व्यवस्था बळकट करणं हा देखील सरकारचा नव्या कृषी कायद्यांमागचा हेतू आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

सरकार शुद्ध हेतूनं काम काम करत असल्याचं नमूद करत नव्या कृषी सुधारणांबाबत काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वर हांडिया ते राजातलाब या दरम्यान बांधलेल्या सहा पदरी रस्त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

या रस्त्यामुळे वाराणसी-प्रयागराज दरम्यानच्या प्रवासाचा वेळ एक तासानं कमी होणार आहे. पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन तिथल्या मार्गिका प्रकल्पाची पाहणीही केली. त्यानंतर ते देवदिवाळीनिमित्त गंगा नदीच्या काठावर आयोजित केलेल्या दीपोत्सव सोहळ्यात सहभागी झाले.