नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीने देशासमोर अनेक मोठी आव्हाने उभी केली असून, या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. फिक्कीच्या 93 वा व्या वार्षिक परिषदेत आज दूर दृश्य प्रणालीद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

आर्थिक आघाडीवर सरकारने केलेल्या प्रयत्नांविषयी बोलतांना ते म्हणाले की,  “देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यानंतर, असे म्हटले जात होते की एक भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये पहिल्या तिमाहीत झालेली 23.9 टक्क्यांची घट भरुन काढायला, भारताला एक ते दोन वर्षे लागतील. मात्र भारताने अगदी थोड्या काळात पुन्हा उभारी घेतली. दुसऱ्या तिमाहीतच भारताच्या जीडीपीमध्ये केवळ 7.5 टक्क्यांची घट नोंदवली गेली. उत्पादन क्षेत्रात, या तिमाहीत 0.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, पहिल्या तिमाहीत त्यात 39.3 टक्क्के घट झाली होती.”

आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यात आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यात, संरक्षण क्षेत्र महत्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

“आम्ही खाजगी क्षेत्रांसाठी दारे खुली केली आहेत, देशांतर्गत उत्पादनात वाढ केली आहे. आम्ही संरक्षण मार्गिका तयार करत आहोत आणि याशिवायही बरेच काही करतो आहोत.” असे संरक्षण मंत्री म्हणाले. इतर देशांसोबत अनेक क्षेत्रात अर्थपूर्ण भागीदारी आणि संयुक्त प्रकल्प राबवण्याची देखील आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

देशांतर्गत संरक्षण उत्पादनांना चालना देण्यासाठी, सरकारने संरक्षण क्षेत्रातील 101 अशा वस्तूंची यादी जाहीर केली ज्यांची आयात आता केली जाणार नाही.यामुळे संरक्षण क्षेत्रातील खाजगी भारतीय उत्पादकांना आपली उत्पादने विकण्याची संधी मिळेल, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

भारताने कोविडशी यशस्वी लढा देत असतांनाच या संकटकाळात, जगभरातील अनेक नागरिकांना मदत केली. मग ते लोकांना सुखरूप मायदेशी पोहचवणे असो किंवा औषधांचा पुरवठा असो किंवा इतर काही मदत असो, भारत सर्वांना बरोबर घेऊनच वाटचाल करतो आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

कृषी क्षेत्रातील सुधारणांविषयी बोलतांना ते म्हणाले की हे कायदे आणि सुधारणा शेतकऱ्यांचे सर्वोच्च हित लक्षत घेऊनच करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार कायमच शेतकरी बांधवांचे म्हणणे, त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यास तयार आहे, त्यांचे गैरसमज दूर करण्यास आणि सरकार जे देऊ शकेल, त्या सर्वांची हमी देण्यास तयार आहे. ‘आमचे सरकार कायमच चर्चा आणि संवादासाठी तयार आहे’ असे संरक्षणमंत्री म्हणाले.