मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा मांडणाऱ्या मिशन मंगल या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मिशन मंगल हा हिंदी चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)यांच्या मंगलयान मोहिमेवर आधारित आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञांचा संघ विशेषत: महिला शास्त्रज्ञांचे मंगलयान मोहिमेतील अमूल्य योगदान, त्यांच्या परिश्रमाची कथा या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे. त्यातून सकारात्मक वैज्ञानिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही यशोगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या चित्रपटाच्या तिकिटावरील राज्य वस्तू व सेवा कर (स्टेट जीएसटी) परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या चित्रपटासाठी, तिकीट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवाकर (एसजीएसटी) चित्रपटगृहांनी प्रेक्षकांकडून वसूल न करता,चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरणा करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात येईल. शासन निर्णय काढल्याच्या तारखेपासून दिनांक ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत तिकीट विक्रीवर शासकीय तिजोरीत भरणा केलेल्या राज्य वस्तू व सेवाकराचा (एसजीएसटी) परतावा देण्यात येईल. हा परतावा देण्याची कार्यपद्धती ठरवण्याचे अधिकार वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्य कर आयुक्तांना देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.