मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं आज सकाळी निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. १९ एप्रिलला त्यांना कोरोनाची लक्षणं आढळली होती. पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेले २३ दिवस ते व्हेंटिलेटर होते. त्यांना साइटोमेगालो व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत गेली.

राजीव सातव हे काँग्रेसमधले धडाडीचे आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात. त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. उपराष्ट्रपती एम व्यकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव हे अफाट गुणवत्ता असलेलं उगवतं नेतृत्व होतं, असं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे.

तर, राजकारणातल्या या संयमी, उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. सातव यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांच्यासह अनेक नेत्यांनी सातव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.