मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचे कारण देत राज्य सरकार अधिवेशन आणि राज्यासमोरच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

सरकारने केवळ दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशाची घोषणा केली, त्याचा निषेध म्हणून आपण विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकत उठून आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा आजार गंभीर आहे, त्याबाबत काळजी घेतली पाहीजे, मात्र कोरोनाचे निमित्त करून अधिवेशनच न घ्यायचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या संसदीय इतिहासात अशाप्रकारची स्थिती कधीही पाहायला मिळाली नाही अशी टीका त्यांनी केली. अशाप्रकारे लोकशाहीचे अवमूल्यन होत असेल तर आपण शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्यात मंदीरे बंद आहेत, त्यामुळे मंदीरांशी संबंधित अनेक घटकांचा रोजगार बंद झाला आहे. मात्र सरकारचं प्राधान्य मदिरागृहांना प्राधान्य असल्यानं ती मात्र चालू आहेत. हे सरकार दारुविक्रीसाठी नव्याने परवाने द्यायला सुरुवात करणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. आपण सरकारच्या या निर्णयाला विरोध करणार असल्याचेही ते म्हणाले.