नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणतीही घटना राजकीय नफा- नुकसानीच्या तराजूमध्ये तोलनं मानवाधिकारांसाठी जास्त हानीकारक ठरतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या वर्धापनदिन समारंभात ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अरुण मिश्रा यावेळी उपस्थित होते. जेव्हा संपूर्ण जग पहिल्या महायुद्धामध्ये होरपळत होतं , तेव्हा भारतानं अधिकार आणि अहिंसेचा मार्ग जगाला सुचवला , असं प्रधानमंत्री म्हणाले. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी प्रेरणास्रोत आहे, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतानं जगाला समता आणि मानवाधिकारांचे नवे पैलू उलगडून दाखवले, असं प्रतिपादन त्यांनी केलं. देशातल्या जनतेला अधिकाधिक सोयी- सुविधा उपलब्ध करून , त्यांच्यावरचा अन्याय दूर करून, त्यांना त्यांचे अधिकार बहाल करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, असं त्यांनी सांगितलं. २०१४ साली सत्तेवर आल्यापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वंचित वर्गाला त्यांचे अधिकार मिळवून देण्याचं काम केलं , असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.