नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदराला भेट दिली. त्या ठिकाणी सीमा शुल्क विभागाकडून व्यापार सुविधा, तंत्रज्ञान, मनुष्यबळाचा सुयोग्य वापर, महसूल निर्मिती आणि गळती रोखणं, आदी क्षेत्रांमध्ये हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्या आधी जवाहरलाल नेहरू बंदरावर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली. सीतारामन यांनी बंदरावरील केंद्रीय पार्किग प्लाझाला भेट देऊन फिरत्या सीमा शुल्क निर्यात विभागाची पाहणी केली. ४५ एकरावर पसरलेल्या या प्लाझाची २ हजार ८०० कंटेनर ठेवण्याची क्षमता आहे. बंदरावरील तुरंत सेवा केंद्राच्या माध्यमातून आयात-निर्यात दस्तावेजांच्या सुलभीकरण कक्षा संदर्भात सितारामन यांना संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इथं असलेल्या जोखीम व्यवस्थापन केंद्रीची त्यांनी पाहणी केली.