मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या दोनशे पस्तीस एवढी होती.

निवडून आलेल्या २४ महिला आमदारांपैकी पन्नास टक्के महिला आमदार प्रथमच सदनात दाखल होणार आहेत. भाजपनं सतरा महिलांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी बारा महिला निवडून आल्या, तर शिवसेनेनं आठ महिलांना उमेदवारी दिली होती, त्यांपैकी दोघींनी विजय मिळवला आहे.

काँग्रेसच्या चौदापैकी पाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ पैकी तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. याशिवाय दोन अपक्ष महिला उमेदवारही विजयी झाल्या आहेत.