मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापूर आणि सांगलीत भाजपा आणि शिवसेनेला मिळालेल्या अपयशाबद्दल बोलताना पाटील यांनी सांगितलं की, या दोन्ही जिल्ह्यात भाजपा सरकारनं अत्यंत प्रामाणिकपणे कामं केली मात्र आमचं नेमकं काय चुकलं, हे आम्हाला जनतेनं सांगावं, आम्ही त्यात सुधारणा करू.

कोल्हापूरमध्ये बंडाळी हे पराभवाचं मुख्य कारण ठरल्याचं सांगत, या वार्ताहर परिषदेत त्यांनी शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर शरसंधान साधलं. संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उघडपणे मदत केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सोयीचं राजकारण करणाऱ्या संजय मंडलिक यांच्यासंदर्भात शिवसेनेनं विचार करावा, असं ते म्हणाले.

कोल्हापुरात झालेल्या पराभवानं खचून नं जाता शिवसेना भाजपा शून्यातून पुन्हा उभी राहील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.