नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारची नऊ वर्षे देशवासीयांची सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानात अजमेर मध्ये आज जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपा पुढचा महिनाभर जनजागरण मोहीम चालवणार आहे.या मोहिमेचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.
सबका साथ, सबका विकास आणि वंचितांना दिलेलं प्राधान्य हे देशात झालेल्या बदलांचं कारण आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं. गेल्या तीन वर्षांत सरकारनं कोट्यावधी घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. भाजप सरकारनं वन रँक वन पेन्शन लागू केल्यापासून देशातल्या माजी सैनिकांना ६५ हजार कोटी रुपये मिळत आहेत असं त्यांनी सांगितलं. छोट्या शेतकऱ्यांच्या अडचणी भाजपानं समजून घेतल्या असून सरकारनं ९ वर्षात कृषी अर्थसंकल्पात सहा वेळा वाढ केली असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रथमच अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.
सरकारने आधुनिक महामार्ग आणि रेल्वेवर सुमारे २४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. डीबीटीच्या माध्यमातून २९ लाख कोटी रुपये गरिबांच्या बँक खात्यात पोहोचले आहेत. गरीब लोकांसाठी घरे बांधण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत २ लाख २५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. गेल्या ९ वर्षांत केंद्र सरकारने मुली आणि महिलांच्या प्रत्येक समस्यांकडे लक्ष देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं.
देशाच्या प्रत्येक यशामागे भारतीय जनतेची मेहनत आहे. भारतातल्या जनतेनंच कोविडनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेलं आहे असं त्यांनी सांगितलं. संसदेच्या नवीन इमारतीला विरोध करणाऱ्या पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले की, या पक्षांनी देशाच्या भावनांचा अपमान केला आहे.
या दशकातली येणारी सात वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले. देसाचे 140 कोटी नागरिक हे आपल्या कुटुंबाचे सदस्य असून राष्ट्र उभारणीसाठी अथक प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.