मुंबई : विदर्भासह संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेती सोबतच शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. शेती आधारित व्यवसायांचं सकल देशांतर्गत उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 20 टक्क्यांवर पोहोचणं अतिशय आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केलं.

अमरावती जिल्ह्यात नांदुरा इथं उभारलेल्या राज्यातल्या पहिल्या पशुचिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेतीला तंत्रज्ञानाची जोड आणि गोपालन व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप देऊन विदर्भातही दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकेल आणि येत्या काळात विदर्भात देखील दूध क्रांती घडेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. अमरावती इथल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोपही काल नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन आविष्कारांचा वेध घेऊन संस्थेनं गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं.