नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट-3 उपग्रहाचं उद्या सकाळी प्रक्षेपण केलं जाणार आहे. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होईल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्रोनं दिली.

पीएसएलव्ही- सी-47 च्या मार्फत हा उपग्रह अंतराळात झेपावेल. त्याचा अंदाजित कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. चांद्रयान-2 मोहिमेनंतर इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे. या उपग्रहावर अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीनं उपयुक्त माहिती त्यातून मिळेल.