स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाची सामाजिक श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड 

पुणे : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया स्मार्ट सिटीज पुरस्कारां’मध्ये पुणे स्मार्ट सिटीने पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. पुणे स्मार्ट सिटीचा स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाची सामाजिक श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशातील स्मार्ट सिटींनी विविध श्रेणींअंतर्गत राबविलेले प्रकल्प व उपक्रमांद्वारे केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळावी व त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड’ स्पर्धा सुरू केली आहे.

स्मार्ट क्लिनिक उपक्रमांतर्गत पुणे स्मार्ट सिटीने बाणेर येथे मागील वर्षी पहिले स्मार्ट क्लिनिक सुरू केले. मूलभूत आरोग्य सेवेसाठीच्या सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे स्मार्ट क्लिनिक नागरिकांसाठी सोयीस्कर वेळांमध्ये सेवा पुरविते. यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. विनामूल्य ‘ओटीसी’ औषधे पुरविण्याबरोबरच काही महत्त्वाच्या चाचण्या अनुदानित दराने येथे केल्या जातात. आरोग्य सेवा पुरविण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य सेवा उपक्रमांचे एकात्मीकरण करण्याचे विचाराधीन आहे.

पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाल्या, “स्मार्ट क्लिनिकच्या प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार व सन्मान मिळाला ही अत्यंत आनंददायी बाब आहे. स्मार्ट क्लिनिकच्या परिसरातील नागरिकांकडून हा उपक्रम ज्या सकारात्मकतेने स्वीकारला गेला आहे हे लक्षात घेऊन आम्ही पुणे शहरातील इतर आणखी तीन भागांतही हा उपक्रम राबविणार आहोत.”