नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूच्या संदर्भानं दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोची, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या सात विमानतळांवर, ४३ विमानांतून आलेल्या ९ हजार १५६ प्रवाशांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
या विषाणूचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती आतापर्यंत या तपासणीत सापडली नसल्याचं, आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात सरकार दक्ष असून, विषाणूचा सामना करण्याची तयारी असल्याचंही त्या म्हणाल्या.
चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना काही लक्षणांची शंका वाटल्यास त्यांनी जवळच्या सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्रात जावं, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या चीनमधल्या संसर्गाबद्दल तिथला दूतावास भारताच्या आरोग्य मंत्रालयाला सतत माहिती देत असल्याचं सचिवांनी सांगितलं आहे.
या पार्श्वभूमीवर,चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतिबंधक उपाय सांगणाऱ्या मार्गदर्शक सूचना मंत्रालयानं जारी केल्या आहेत.यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपली सज्जता तपासून पाहावी अशा सूचना आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. तसंच ३१ डिसेंबरपासून भारताच्या व्हिसासाठी अर्ज केलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्याही समुपदेशनासाठी प्रयत्न सुरू आहेत.