नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोनाकोपऱ्यात डिजिटल बँकिंगविषयक भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यास आणि पारदर्शकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशभरातल्या ७५ जिल्ह्यातील ७५ डिजिटल बँकिंग एककं दूरस्थ पद्धतीनं काल राष्ट्राला समर्पित करताना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातल्या ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डिजिटल बँकिंग एककं स्थापन करण्याचा हेतूनं हा उपक्रम सुरु करण्यात आला.बचत खातं सुरु करणं, खात्यातल्या बचतीची माहिती, खातेपुस्तिका छपाई, रक्कम हस्तांतरण, मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक, कर्ज, धनादेश, क्रेडीट आणि डेबिट कार्डकरता अर्ज, कर आणि देयके भरण्यासह बँकिंग संदर्भातल्या अनेक कामांकरिता या डिजिटल बँकिंग एककांचा उपयोग होणार आहे.
देशात तळागाळापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असून, सर्वसामान्य लोकांचं जीवन सुगम व्हावं यासाठी सरकारने उचललेलं हे महत्वाच पाऊल आहे, ही बँकिंग एककं डिजिटल सेवांना अधिक सक्षम करतील.नव्या भारतामध्ये बँकिंग सेवा सर्वांसाठी सहजतेनं उपलब्ध होतील, जनधन, आधार, मोबाईल सेवांनी सामान्यांना सुविधा लवकर पोहोचवण्यातले अडथळे दूर केले आहेत. योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होत असल्यामुळे आर्थिक वितरणातही पारदर्शकता आल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितल. या डिजिटल बँकिंग युनिट्समुळे आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन मिळेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी बोलताना सांगितल. तर देशभरात ७५ जिल्ह्यांमध्ये विक्रमी सहा महिन्यांमध्ये ७५ डिजिटल बँकिंग एककं स्थापन करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. यामध्ये, महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद आणि सातारा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील एककांचा समावेश आहे.या कार्यक्रमाला सातारा इथून खासदार धनंजय महाडीक, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. राजीव, आदी मान्यवर दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. डिजीटल बँकेतील अधिकारी ग्राहकांना डिजिटल व्यवहार कसे करावेत याबाबत मार्गदर्शन करणार असून, ऑनलाईन फसवणूक होणार नाही यासाठी ग्राहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.