मंत्रालयात बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यान संपन्न

मुंबई : वाढत्या नागरिकीकरणामुळे लोकप्रशासनापुढे नवीन आव्हाने निर्माण होत असून त्यावर अधिक कार्यक्षमतेने मात करावी लागेल. उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, पर्यावरणीय परिसंस्थांचे जतन, ऊर्जा निर्मितीसाठी अपारंपरिक स्रोतांचा वापर, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था, उत्तम दळणवळण व्यवस्था आदी बाबींना यापुढील काळात अधिक महत्त्व असेल, असे मत निवृत्त मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांनी व्यक्त केले.

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या (आयआयपीए) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने मंत्रालयात आयोजित बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. ‘द इव्हॉल्विंग पॅराडाइम ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र सिन्स इंडिपेन्डन्स’ हा व्याख्यानाचा विषय होता. राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त तथा आयआयपीए-महाराष्ट्र शाखेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली आणि महारेराचे सदस्य तथा आयआयपीएचे मानद सचिव डॉ. विजय सतबीर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 मध्ये आपण प्रशासनात आलो, असे सांगून श्री. सुकथनकर म्हणाले, प्रशासनासमोरील त्यावेळचे काही प्रश्न आणि आजचे प्रश्न वेगळे होते. जिल्हा स्तरावर काम करत असताना फाळणीनंतरच्या स्थलांतरित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, ग्रामीण गरिबी निर्मूलन, देशाची आर्थिक वाढ आदी प्रश्न समोर होते. देशामध्ये पंचवार्षिक योजना, लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी गट (ब्लॉक) विकास, सेवांचा ग्रामस्तरापर्यंत विस्तार, पंचायत राज संस्थांची निर्मिती अशा उपाययोजना हाती घेतल्या गेल्या. प्रादेशिक विकासासाठी उद्योगांचे विकेंद्रीकरण, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांना चालना देण्याचे काम केले गेले. सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा विकास करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. सुकथनकर यांनी पर्यावरणीय परिसंस्थांचे जतन, वने व जैवविविधता, जलस्रोत बळकटीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर, खनिज तेलांवरील अवलंबित्व कमी करुन अपारंपरिक आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन आदींबाबत सविस्तर विवेचन केले. प्रशासनाला गुन्हे, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण आदी काही बाबी कोणत्याही कालावधीमध्ये हाताळाव्या लागतात. वाढत्या  नागरिकीकरणामुळे अधिकच्या गरजा पुरविताना प्रशासनावर ताण येतो, पुढील काळात हे आव्हान पेलावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी श्री. क्षत्रिय यांनी उपस्थितांचे स्वागत करुन श्री. सुकथनकर यांनी प्रशासनात बजावलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.