पिंपरी : महापालिकेच्या शनिवारी आयोजित केलेल्या विशेष महासभेत चिंचवड स्टेशन येथील एका अनधिकृत टपरीधारकावर कारवाई करणार्‍या सत्ताधारी भाजप नगरसेवक शितल शिंदे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचे पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिंदे यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीचा निषेध केला. तसेच शहराला अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे सांगत प्रशासनावर आगपाखड केली.

शहरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे. चौका-चौकातील अतिक्रमणावर कारवाई करावी. येत्या 15 दिवसात टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात याव्यात. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी. मुजोर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. असे सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले.

नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापौर राहुल जाधव यांनी सर्व प्रभागातील रस्त्यांवरील रहदारीला अडथळा ठरणार्‍या बेकायदेशीर टपर्‍या, अतिक्रमणांवर येत्या 15 दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.