नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात यावर्षीच्या हंगामातल्या नवीन हळदीचे सौदे आज सुरू झाले. या सौद्यात हळदीला ७ हजार ५०१ रुपये क्विंटल असा पहिला दर मिळाला. त्यानंतर सौदा झालेल्या दुसऱ्या हळदीला ७ हजार ६०१ रुपये दर मिळाला.
सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून हळद सौद्यांना सुरुवात झाली. यावेळी अन्य राज्यांमधले हळद व्यापारी, शेतकरी, स्थानिक व्यापारी आणि हमाल उपस्थित होते.सांगली ही देशातील हळदीची अग्रेसर व्यापारपेठ आहे.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथली हळद विक्रीसाठी आली आहे.यावर्षी आरंभीच्या सौद्याला मध्यम प्रतीची हळद आल्यामुळे दर साडेसात हजार आला पण चांगल्या प्रतीच्या हळदीला नऊ हजार रुपयापर्यंत दर येईल, असा विश्वास हळद व्यापारी मनोहर सारडा यांनी व्यक्त केला.