नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हिमबिबटया दिवसाच्या निमित्तानं हिमबिबटयांची गणना करण्यासाठी राष्ट्रीय पोट्रोकॉल अभियानाची सुरुवात केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागानं सुरु केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
हिमबिबटयाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी तसंच हिमालयातल्या सुंदर वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 23 ऑक्टोबर हा दिवस ‘हिमबिबटया दिवस’ म्हणून साजरा केला जातो. नवी दिल्ली इथं पर्यावरण आणि जागतिक हिमबिबटया संरक्षण या विषयावर आधारित चौथ्या सुकाणू समितीच्या बैठकीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
हिमबिबटया आढळणारे सर्व देश त्यांची गणना करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कमी होणा-या वन्य प्राण्याची संख्या दुप्पट करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करायला हवेत, असंही ते म्हणाले. भारतात 2 हजार 967 वाघ आहेत. जगभरात असणा-या वाघांच्या एकूण संख्येच्या 77 टक्के वाघ भारतात आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, आणि लडाखमधे जवळपास 400 ते 700 हिमबिबटयांची संख्या आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिका-यांमुळे हिमबिबटयांची संख्या कमी होत आहे, हिमबिबटे हे जैवविविधतेचे मुख्य घटक असल्याचं ते म्हणाले.