मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या आरे कॉलनीतली वृक्ष तोड थांबवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली.

या आंदोलनात ३८ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला होता, तसंच सहा महिलांसह २९ जणांना अटक केली होती. त्यानंतर सहा ऑक्टोबरला सत्र न्यायालयानं त्यांना काही अटींवर जामिन दिला होता. दरम्यान राज्य सरकारनं आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे, मात्र मेट्रो रेल्वे प्रकल्प थांबवलेला नाही, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.